Sunil Tatkare On Naresh Mhaske : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पर्यटक अडकले होते. त्यांना राज्य सरकारकडून मदत करत पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आलं. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीर प्रशासन आणि तेथे अडकलेल्या पर्यटकांमधील समन्वयासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना श्रीनगरला पाठवलं होतं.
पण दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन काही पर्यटकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी मदत केली. त्यामुळे महायुतीत पर्यटकांच्या मदतकार्यावरून श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं उघड झालं. मात्र, या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक विधान केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. जे कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानातून आणल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी शिवसेना (शिंदे) पक्षावर टीका केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच खासदार नरेश म्हस्के यांचं हे विधान अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वांनीच मदत करण्याची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आपत्तीजनक परिस्थितीत मदतीला धावून जात असतात. मात्र, खासदार नरेश म्हस्के यांनी कशामुळे ते विधान केलं ते मला माहिती नाही. मात्र, त्यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं होतं, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे”, असं सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
नरेश म्हस्के यांनी काय म्हटलं होतं?
काश्मीर येथून पर्यटकांना परत आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना नरेश म्हस्के यांनी म्हटलं होतं की, “एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकार्यांना प्रोत्साहन मिळालं, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले आणि एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं आणि ती लोकं पहिल्यांदा विमानात बसत आहेत, रेल्वेनी गेलेली लोकं आहेत. पहिल्यांदा विमानात बसवून त्यांना महाराष्ट्रात आणलं आहे”, असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं होतं.