Sunil Tatkare On Ministers Oath Taking Ceremony : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळाची विस्तार आज होणार आहेत. यासाठी अवघे काही तास उरले आहेत मात्र तरीही तीनही पक्षांकडून अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनी त्यांच्या पक्षातील ९ आमदार आज शपथ घेतील असे सांगितले आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या पक्षातील १० मंत्री असणार आहेत हे निश्चित झाले आहे. यादरम्यान तटकरे यांनी रोहित पवार आणि जयंत पाटील हेदेखील महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नावरही उत्तर दिले आहे.

महायुतीतील पक्षांकडून आपल्या पक्षातील आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केले जात आहेत. आपल्या पक्षाकडून कोणाला फोन करण्यात आले? आपल्या पक्षातील कोण-कोण मंत्रीपदाची शपथ घेणार? या प्रश्नांना मात्र तटकरे यांनी उत्तर देणे टाळले. थोड्याच वेळात आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार येतील आणि त्यानंतर याबद्दल स्पष्टता येईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले. आज चार वाजता माहायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी आहे हे खरं आहे असंही तटकरे यावेळी म्हणाले.

रोहित पवार,जयंत पाटील सहभागी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील हे देखील आज महायुतीच्या मंत्र्यांसोबत शपथ घेतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, “हे बहुतेक गॉसिपच असावं, यामध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध असण्याचं कारण नाही… संपर्कही नाही आणि संबंधही नाही. आम्ही वेगळा विचार करूनच सव्वा वर्षापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत दिलं आहे”, असेही तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा>> DY Chandrachud : “धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल व्हायला हवा”, ठाकरे गटाचे गंभीर आरोप; मोदींवरही टीकास्र

शिवसेना (शिंदे) पक्षाचे कोणते नेते शपथ घेणार?

नागपूरमध्ये आज (रविवारी) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार भारत गोगावले यांनी आज शिवसेनेचे कोणते आमदार शपथ घेणार याची माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या पक्षात पाच वरिष्ठ नेते आहेत. उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि संजय राठोड आहेत. तसेच नव्या नेत्यांमध्ये मी, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर या नेत्यांना फोन गेलेले आहेत. एकूण १२ लोकांना फोन गेलेले असून ते शपथ घेतील, असे भरत गोगावले म्हणाले.

Story img Loader