Sunil Tatkare On Uttamrao Jankar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे ईव्हीएमच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता उत्तम जानकर ईव्हीएमच्या मुद्यांवरून दिल्लीत आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी उत्तम जानकर यांनी केलं आहे. तसेच २३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा देणार आहोत, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उत्तम जानकर यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. ‘आमदारकीचा राजीनामा हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यावा लागतो, तोच खरा अधिकृत राजीनामा असतो’, असं म्हणत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील तटकरे काय म्हणाले?

“विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना त्यांचा राजीनामा द्यायचा असेल तर त्या-त्या अध्यक्षांकडे म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा विधानपरिषदेचे सभापती असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्यावा लागतो. मग तोच खरा अधिकृत राजीनामा असतो. मात्र, इतर दिखाव्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी आणि नैराश्यासाठी तयार केलेले हे फेक नरेटिव्ह आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. बाकी काही नाही. अजूनही पराजयाच्या मानसिकतेमधून विरोधक बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करत असतील”, असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

आमदारकीच्या राजीनाम्याबाबत उत्तम जानकर काय म्हणाले?

“ईव्हीएमच्या मुद्याला मारकडवाडी गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश संपूर्ण माळशिरस तालुक्यात आहे. आता माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी १२०६ लोकांनी हात वरती करून मतदान केलं. पण त्या गावात मला ९६३ एवढेच मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत आणि धानोरे गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. आता जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर २३ जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.

उत्तम जानकर दिल्लीत आंदोलन करणार

“आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर २५ जानेवारी रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मी (उत्तम जानकर) आणि बच्चू कडू आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच माझ्या मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र, जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरु आहे. त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील”, असंही आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare on ncp sharad pawar group mla uttam jankar will resign from mla and delhi election commission gkt