Sunil Tatkare On Guardian Minister Post : महायुतीच्या सरकारने शनिवारी (१८ जानेवारी) राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र, रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. त्यामुळे भरत गोगावले यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न दिल्यामुळे त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर महायुतीत धूसफूस सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, भरत गोगावले यांच्या नाराजीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे. तसेच सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं”, असं सूचक भाष्य सुनील तटकरे यांनी केलं.
सुनील तटकरे काय म्हणाले?
भरत गोगावले यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. त्यामुळे जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयाचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
भरत गोगावले काय म्हणाले?
पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आल्यानंतर भरत गोगावले यांनी म्हटलं की, “आमच्या सहाच्या सहा आमदारांनी (रायगडच्या) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत. मात्र, आता जे केलं ते अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.
शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला
पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास २ तास महामार्ग रोखून धरला होता.