Sunil Tatkare : महायुती सरकारने १८ जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा समावेश आहे. मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. तसेच आपण रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. मात्र, पालकमंत्री पदाची यादीतून त्यांना डावलण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. त्यामुळे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखत आंदोलन करत खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे रायगडमध्ये चांगलंच राजकारण तापलं. मात्र, यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केला. या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर आम्ही योग्य ती चर्चा करणार आहोत”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीकोणातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत. मला विश्वास आहे की त्यांची भेट ही राज्याच्या परकीय गुंतवणुकीच्या अनुषंगाने फायद्याची होईल. मात्र, अशावेळी राज्यात पालकमंत्री पदाचा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही. मात्र, राजकारणात काही वेळेला काही गोष्टी घडत असतात. मात्र, आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. विचारधारेशी बांधील आहोत. आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत विचाराची दिशा दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर योग्य ती चर्चा होईल”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

भरत गोगावले काय म्हणाले होते?

पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं होतं की, “आमच्या सहाच्या सहा आमदारांनी (रायगडच्या) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत. मात्र, आता जे केलं ते अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल. मात्र, मी नाराज आहे”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare on raigad nashik guardian minister and bharat gogawale raigad palak mantri ncp vs shivsena politics gkt