Sunil Tatkare : राज्यातील महायुती सरकाराच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपू्र्वी झाला, त्यानंतर खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी अद्यापही पालकमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच बीड जिल्ह्यात घडेलेल्या घटनांवरून बीडचं पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: कडे घ्यावं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘जोपर्यंत वरिष्ठ स्थरावर निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षांतर्गत निर्णय घेता येत नाही’, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
सुनील तटकरे काय म्हणाले?
पालकमंत्री पदासंदर्भात सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाचा निर्णय कधी होणार? असा प्रश्न सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “पालकमंत्री पदासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करून घेतील. माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री पदाचा निर्णय त्यांच्या स्थरावर दोन ते तीन दिवसांत होईल. महायुतीचे प्रमुख या नात्याने ते तिघेजण जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळेल?
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे मंत्री आदिती तटकरे या देखील पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार सुनील तटकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “मी याआधी देखील स्पष्ट केलं आहे की, पालकमंत्री पदासंदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते जे ठरवतील ते रायगड जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यासाठी असेल आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
अजित पवार बीडचे पालकमंत्री होतील का?
बीड जिल्ह्यात घडलेल्या घटना पाहता बीड जिल्ह्यातं पालकमंत्री अजित पवार यांनी व्हावं, अशी मागणी काही नेत्यांनी केलेली आहे. यासंदर्भात आज सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार बीडचे पालकमंत्री होतील का? कारण बीडचं पालकमंत्री याआधीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे होतं? यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “असं आहे आधी पालकमंत्री पद कोणाकडे होतं? त्याच्या आधारेच यावेळीही पालकमंत्री पद दिले जाणार आहेत की नाही? यासंदर्भातील धोरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. त्या अनुषंगाने जो निर्णय होईल मग त्यानंतर अजित पवार, प्रफुल पटेल आणि मी (सुनील तटकरे) आम्ही चर्चा करून ठरवू. जोपर्यंत त्यांच्या (वरिष्ठांच्या) स्थरावर निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षांतर्गत निर्णय घेता येत नाही. कारण आमचे १० मंत्री आहेत. त्यामुळे किती आणि कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळतील, त्यानंतर कोणाला जबाबदारी द्यायची ते ठरवू”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.