मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर महायुतीतील नेत्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनीही या पाठिंब्याबाबत राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या राडगडमध्ये मनसेची मोठी ताकद आहे, त्याचा फायदा महायुतीला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. रायगडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिला.
हेही वाचा – “मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे…
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानतो. राज ठाकरे हे प्रचारासाठी राज्यभर दौरा करणार आहेत. या दौऱ्याच नियोजन राज्यपातळीवर होईल. रायगड मतदारसंघात मनसेची ताकद आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीला याचा नक्कीच फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मुस्लीम समाजाची मते महायुतीला मिळणार नाही, हा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जातो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठी प्रगती केली आहे. अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठीसुद्धा विविध योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. राज्यातही शिंदे सरकारने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा निधी ८०० कोटी रुपयांवर नेला. अल्पसंख्याक समाज सुज्ञ आहे. तो महायुतीला पाठिशी आहे.”
हेही वाचा – ‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची …
दरम्यान, विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांबाबत त्यांना विचारण्यात आलं असता, “विरोधक ज्यावेळी निवडून येतात, तेव्हा ईव्हीएम बरोबर असते. मात्र, पराभूत झाले तर ईव्हीएममध्ये घोळ आहे, असा आरोप केला जातो. ही भूमिका योग्य नाही. मुळात विरोधकांकडे विकासाचा कोणताच मुद्दा राहिला नाही. त्यांच्याकडे वैचारिक मुद्दा राहिला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.