अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी पत्रावर मी सही केली होती. पण, भाजपाबरोबर जाण्यासाठी त्या पत्राचा वापर करण्यात आला. ही सरळ-सरळ चोरी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होतीय याला खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नुकतेच राजकारणात पदार्पण झालेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तटकरेंनी रोहित पवारांना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना तटकरे म्हणाले, “राहुल गांधींनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेपेक्षा रोहित पवारांच्या ‘संघर्ष’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून मिळालेला आत्मविश्वास नैराश्याच्या माध्यमातून लपवता येत नाही. तेव्हा आरोप करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. नुकतेच राजकारणात पदार्पण झालेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा आणि अजित पवारांवर आरोप करण्याचा प्रयत्न करू नये.”

“अजित पवारांना त्यांच्या गुणवत्तेवर पदे मिळाली”

“विधीमंडळ पक्षाची बैठक २०१९ साली झाली आहे. विधीमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड एकमताने करण्यात आली. पण, अजित पवारांना त्यांच्या गुणवत्तेवर पदे मिळाली,” असेही तटकरेंनी म्हटलं.

“आयुष्यभर खोटे बोलणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही”

‘अजित पवारांना विरोधी पक्षनेते पद हवे होते. सत्तेत आल्यानंतर देखील सर्व पदे त्यांनाच हवी होती,’ असं मत आमदार जितेंद्र आव्हाडांनी मांडलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर सुनील तटकरेंनी सांगितलं, “आयुष्यभर खोटे बोलणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. कारण, ते लक्ष देण्याच्या क्षमतेचे नाहीत. अजित पवारांना विरोधी पक्षनेते व्हायचं नव्हतं. पण, विधीमंडळ सदस्यांची इच्छा अजित पवारांनी विरोधी पक्षनेते व्हावं, अशी होती. अजित पवारांना गुणवत्तेवर पदे मिळाली. संघटना अजित पवारांच्या पाठीमागे उभी होती.”

“शरद पवारांना माणसं निवडण्याची पारख”

‘मी देखील मला विरोधी पक्षनेते करावे असे एक पत्र शरद पवार यांना दिलं होतं,’ असं विधान आव्हाडांनी केलं होतं. यावर प्रश्न विचारल्यावर तटकरे म्हणाले, “एखादं महत्वाचं पद मागायला गुणवत्ता लागते. कोण कुठल्या पदावर काम करण्यासाठी सक्षम आहे, याची पारख शरद पवारांना आहे. आमदारांचं पाठबळ कुणाच्या पाठीमागे आहे, हे शरद पवारांना माहिती असल्यानं अजित पवारांबाबत वेळोवेळी निर्णय झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare reply rohit pawar and jitendra awhad over ajit pawar statement ssa