कराड : माजीमंत्री विजय शिवतारे यांचे अजित पवारांबद्दलचे वक्तव्य अतिशय निंदनीय असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी त्यांच्या पक्षाकडे विनंती केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गत विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान देवून त्यांचा पुरंदर मतदार संघातून पराभव केला होता. याची सल असल्याने आता लोकसभेच्या बारामती मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करीत विजय शिवतारे यांनी आता अजित पवारांवर बदल्याची भाषा करीत अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अडचणीत येणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. याबाबत तेढले असता सुनील तटकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा >>>शरद पवारांचा दणका: रद्द झालेला बारामतीतील व्यापारांचा मेळावा होणार

विजय शिवतारेंचे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. मी त्यांच्या पक्षाकडे (शिवसेना) शिवतारे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे. महायुतीतील सामंजस्याचे वातावरण टिकवल गेलं पाहिजे हे महत्वाचे आहे. शेवटी अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि कुणाही पक्षाच्या प्रमुखाबद्दल किंवा वरिष्ठस्तरावरील नेत्यांबद्दल मित्रपक्षाच्या कुणाकडून सुध्दा अशा पद्धतीची वक्तव्ये महायुतीसाठी संयुक्तिक नसल्याची तीव्र नाराजी तटकरे यांनी व्यक्त केली.

सन्मानपूर्वक जागा मिळतील

भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला तीन किंवा चारच जागा देण्यात येतील अशी राज्यभर चर्चा आहे, यासंदर्भात तेढले असता, सुनील तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले, मी एवढेच निश्चितपणे सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या भाजपच्या मित्र पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शक्तीस्थळ असलेल्या ठिकाणची जागा त्या- त्या पक्षाला निश्चितपणे मिळणार असल्याचा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा >>>परीक्षेतून आता पुरवणी हद्दपार; उत्तरपत्रिकेच्याच पानांमध्ये वाढ

लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची नुकतीच बैठक होऊन त्यात चर्चा झाली. उद्या किंवा परवा पुन्हा वरिष्ठस्तरावर बैठक होऊन आणखी चर्चा होईल आणि जागा वाटपाला अंतिम स्वरूप देण्यात येईल असे तटकरे यांनी सांगितले.

शिवतारेंबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल – अजित पवार

दरम्यान, कराडच्या प्रीतिसंगमावरील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर बोलताना अजित पवारांना विजय शिवतारे यांच्या जाहीर भूमिकेबद्दल विचारले असता, पवार यांनी याबाबत मला काही बोलायचे नाही. शिवतारेंबद्दल वरिष्ठ पातळीवर काय तो निर्णय घेतला जाईल. महायुतीतील सर्वांनी सुसंस्कृतपणा दाखवावा हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय तरी घटक पक्षांनी आपल्यातील वातावरण खराब किंवा गढूळ होईल अशा प्रकारचे कुठलेच वक्तव्य करू नये अशी अपेक्षा अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare requests shiv sena to take strict action against vijay shivtare regarding his statement about ajit pawar amy