राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. या दौऱ्यानिमित्त ते जाहीर सभा घेऊन जनतेशी संवादही साधत आहेत. या जाहीर सभांना उत्तर देण्याकरता अजित पवार गटाकडूनही उत्तरदायी सभा घेण्यात येतेय. परंतु, शरद पवार आता जिथं सभा घेतील, तिथं उत्तरसभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाने दिला आहे. पक्षफुटीसंदर्भात निवडणूक आयोगात सुरू सुनावणी सुरू असून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून फटकारलं जात असल्याने हा उत्तरसभा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पक्षाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“आम्ही दोनच सभा उत्तरसभा म्हणून घेतल्या. बीड आणि कोल्हापूर येथे या उत्तरसभा झाल्या. येवल्याला आमची काही सभा झाली नाही. परवा कळबंटला पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. युवा संघर्ष यात्रा म्हणजे कुणाशी संघर्ष, कसला संघर्ष ते आता कळेल. ज्यांनी युवासंघर्ष यात्रा काढली, त्यांनीच भाजपामध्ये सहभागी होण्याकरता पत्र दिलं होतं. त्यावेळी राम शिंदेंनी प्रश्न विचारले होते, त्याची उत्तर अवघ्या महाराष्ट्राला अद्यापही मिळालेली नाहीत”, असं सुनिल तटकरे म्हणाले.
“पुण्याला सभा घेण्याचा आमचा काही मानस नाही. रविवारी पुणेकर अजित पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आले. हे भाग्य अजित पवारांचंच असेल, कारण पुणेकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे”, असंही ते म्हणाले.
“निवडणूक आयोग आणि उत्तरसभांचा दुरान्वये संबंध नाही. पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी अजित पवार राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनाची तयारी सुरू करतोय. दसरा झाला की राज्यात झंझावाती दौरे सुरू करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली. सरकारमध्ये सामील झाल्यास आज १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधाला. त्यावेळी हे स्पष्टीकरण दिलं.