आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी तयारीला सुरवात केली. मुंबईतील मेघदूत बंगल्यावर चाकरमान्यांचा मेळावा घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
रायगडच्या लोकसभा श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील पण मुंबईत निवासी असणारे जवळपास एक हजार ग्रामस्थ या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत श्रीवर्धन मतदारसंघात केलेल्या कामांचा पाढा वाचला. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी पावणे चारशे कोटींचा निधी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिली तर आपल्याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शाम भोकरे यांनी गेल्या २५ वर्षांत आला नाही एवढा निधी तटकरे यांनी मतदारसंघात आणला असल्याचे सांगितले. महम्मद मेमन आणि अनिकेत तटकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कोकणातील निवडणुकांमध्ये चाकरमान्यांची महत्त्वाची भूमिका असते. या चारमान्यांच्या मतावरच राजकारण चालत असते. ही बाब लक्षात घेऊन तटकरे यांनी तालुकानिहाय चाकरमान्यांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जत आहे.
लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यासाठी लोकांची मते आजमावण्याचा प्रयत्न या मेळाव्यांच्या माध्यमातून केला जात आहे. लवकरच महाड, पोलादपूर, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातील मुंबई निवासी ग्रामस्थांचे मेळावे तटकरे घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या मतदारसंघात कुणबी समाजाची मते मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे कुणबी समाज मंडळालाही जवळ करण्याचा प्रयत्न या मेळाव्यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे बोलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा