अलिबाग : अनिश्चित काळासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रोखणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. प्रशासनाची ताब्यात यंत्रणांच्या अनिश्चित काळासाठी सत्ता देणे योग्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. राज्यसरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर लगेचच निवडणूका घेणे गरजेचे आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत केवळ सहा महिन्यांकरता स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात दिला जाऊ शकतो. मात्र गेल्या वर्षभरापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज कार्यरत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता या निवडणूका कधी होतील हे राज्यसरकार आणि देवालाच माहीती. पण अनिश्चिच काळासाठी निवडणूका रोखणे योग्य नाही. ते घटना दुरुस्तीला धरूनही नाही. त्यामुळे राज्यसरकारने लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेकापचे बाळाराम पाटील हे आमचे उमेदवार आहेत. गेल्या सहा वर्षात त्यांनी चांगले काम केले आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या निवडणूकीतही त्यांना यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आरसीएफ सारखा प्रकल्प जनसुनावणी लवकर होणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रकल्पही गुजरात मध्ये जाऊ शकतो. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले पाहीजेत, पण त्यासाठी प्रकल्प व्हायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय रसायन मंत्री यांना पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. गेल्या चार वर्षात पंतप्रधान ग्राम सडक योजने ३ आंतर्गत राज्यात एकही एकही काम मंजूर करण्यात आले नव्हते. या संदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर ४८ कोटी रुपयांची ११ कामे रायगड जिल्ह्यात मंजूर करण्यात आली असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare statement stopping elections indefinitely is for democracy dangerous ysh