अलिबाग- लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता टिपेला पोहोचली असतानाच, अलिबागमध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ही फलकबाजी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. मतदान ते मतमोजणी यात जवळपास एक महिन्याचा कालावधी होता. त्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेल्याचे पहायला मिळत आहेत.
हेही वाचा – सांगली : इन्स्ट्राग्रामवर अश्लिल चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नव्हता. त्यामुळे बदलत्या राजकीय समिकरणात रायगड मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. मतदानोत्तर चाचणीचे कल नुकतेच जाहीर करण्यात आले. या मतदानोत्तर चाचणीमध्ये रायगड लोकसभेच्या जागेबाबत संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. ४ तारखेच्या निकालाकडे तमाम रायगडकरांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
अशातच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी अलिबाग परीसरात सुनील तटकरे यांच्या विजयाचे फलक लावले आहेत. “जल्लोष कर्तुत्वाचा आणि जनतेच्या विश्वासाचा तटकरे साहेबांच्या विजयाचा” अशी वाक्य त्यावर लिहिण्यात आली आहेत. निकालाआधीच झालेल्या या फलकबाजीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा – छगन भुजबळ कोणत्या गटात आहेत? जयंत पाटील सूचक वक्तव्य करत म्हणाले, “उद्या संध्याकाळी…”
मतदारसंघासाठी शिवसेना उबाठा गटाचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात तिसऱ्यांदा लढत झाली आहे. २०१४ मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतील अनंत गीते अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत दोघांमध्ये पुन्हा एकदा चुरस पहायला मिळाली होती. यात सुनील तटकरे तीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे २०२४ मध्ये दोघांमध्ये अटीतटीची लढत होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे. जिल्ह्यात बदललेली राजकीय समिकरणे आणि मुस्लीम, बहुजन मतांचे झालेले ध्रुवीकरण यामुळे तटकरेंची कोंडी होईल असा कयास जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. अशातच केणी यांनी लावलेल्या या फलकामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.