ज्या रायगड जिल्ह्य़ात सुनील तटकरे यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा, त्याच रायगडात आज कार्यकत्रे आणि पदाधिकारी तटकरे यांना उघडपणे आव्हान देऊ लागले आहेत. त्यांच्या एकाधिकारशाहीवर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. आजवर कार्यकत्रे आणि पदाधिकाऱ्यांकडून होणारा विरोध आता तटकरे यांच्या घरात येऊन पोहोचला आहे. पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून रोहा नगरपरिषदेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोह्य़ात काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे तटकरेंच्या अडचणीत भर पडणार आहे.

सुनील तटकरे राज्याच्या राजकीय वर्तुळातील हायप्रोफाईल नाव, राष्ट्रवादीच्या पहिला फळीतील नेते, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते. राज्यमंत्रिमंडळात कोकणाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव. प्रशासनावर पकड असलेला नेता अशी या नेत्याची ओळख. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची पकड प्रस्थापित केली. आता मात्र ही पकड सुटत चालली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

पक्षाला सध्या मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. जिल्हा परिषदेत शेकापशी जुळवून घेतल्यापासून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे, प्रकाश देसाई यासारखे ज्येष्ठ नेते पक्षापासून दुरावले आहेत. ही नाराजी आता थेट तटकरे यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीपासून सुनील तटकरे आणि अनिल तटकरे या दोन भावांमधील त्यांच्या कुटुंबातील संबंध ताणले गेले होते. तेव्हापासून पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहण्याचे धोरण अवधूत तटकरे यांनी स्वीकारले होते.

रोहा नगर परिषद निवडणुकीत संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी अशी अवधूत तटकरे आणि अनिल तटकरे यांची इच्छा होती. मात्र सुनील तटकरे यांनी संदीप याला डावलून त्यांचे व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली. दोन कुटुंबांतील वाद उफाळून आला. नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्याने संदीप यांनी शिवसेनेची मदत घेऊन उमेदवारी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या अर्ज तांत्रिक कारणामुळे अपक्ष राहिला. आता शिवसेनेत थेट प्रवेश करून आपण सेनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

रोहा नगर परिषदेचेये विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, शहर अध्यक्ष स्नेहा आंब्रे यांनी आधीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. आता थेट तटकरे कुटुंबातील व्यक्तीनेच पक्षनेतृत्वाला आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे. यात कोण बाजी मारेल हे जरी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र ज्या रायगड जिल्ह्य़ात सुनील तटकरे यांचा शब्द प्रमाण मानला जायचा तिथे ही परिस्थिती का ओढावली याचा विचार करण्याची वेळ आली आहे.