कल्पेश भोईर

वसई ग्रामीण भागांत रोज ४९ टँकरद्वारे पुरवठा; विहिरींनी तळ गाठला

वसई-विरार महापालिका क्षेत्रात पूर्वेकडील भागांत अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पालिकेच्या वतीने ज्या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत अशा भागात टँकरच्या  साहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून त्या भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी दिला जात असल्याचा दावा केला जात आहे. या ग्रामीण भागात रोज ४९ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरविले जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, पारोळ, भाताणे या परिसरांत पाण्याची भीषण समस्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील नागरिकांची वणवण सुरूच आहे. मे महिन्याच्या अखेरीस या परिसरात असलेल्या आजूबाजूच्या गावांनादेखील पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे टँकरने अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या येथील नागरिकांना कूपनलिका, विहिरी, तलाव येथीलच पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. कूपनलिकांमधून पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. याशिवाय महापालिका टँकरद्वारे पाणी पुरवत आहे. पालिकेमार्फत पुरवले जात असलेले पाणी अपुरे आहे. यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शहराला पालिका पाणीपुरवठा करीत आहे, मात्र त्याच वेळी वसईच्या ग्रामीण भागांत पाण्याचा योग्य पद्धतीने पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागांतील पाण्याचे स्रोतही बंद पडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विहिरी, तलावांची पातळी खालावली आहे. काही ठिकाणी विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जादाचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यातील काहींना अधिक दाम मोजून पाणी विकत घेणे परवडत नसल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

कामण, चिंचोटी, कोल्ही, सागपाडा या परिसरांतील नागरिकांना पिण्याचे पाणीदेखील योग्यरीत्या मिळत नसल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेचे अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्याच वेळी ग्रामीण भागात पालिकेच्या जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. याचाही पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पंचायत समितीकडून कूपनलिका

वसईच्या ग्रामीण भागातील पाण्याची समस्या लक्षात घेता पंचायत समिती वसई यांच्या वतीने खेडय़ापाडय़ांतील भागांत ४६ सार्वजनिक कूपनलिका मंजूर करण्यात आल्या होत्या. यामध्ये वसई पूर्वेतील भागात सायवन, पारोळ, माजीवली, पोमण, मेढे, सकवार, खानिवडे, चंद्रपाडा, तिल्हेर, नागले, शिरवली, खार्डी, उसगाव, शिवणसई या भागांत मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील आतापर्यंत २० ठिकाणी बोअरवेल मारण्यात आल्या असून बाकीच्या कूपनलिका मारण्याचेदेखील काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

६९ गावांत पाणी योजनेची रखडपट्टी

वसई-विरार भागांतील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार होता, पंरतु अनेक वर्षांपासून या योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने अजूनही ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे या योजनेतून बांधण्यात आलेले जलकुंभ जलवाहिन्यादेखील अजूनही कोरडय़ाच आहेत.

Story img Loader