नाशिक : ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी त्र्यंबक रस्त्यावरील रिसॉर्टमधील लग्न सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी महाजन यांनी भाषण केले. आमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा व महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगताच शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चपराक बसली असून न्यायालयाने सरकारवर शिक्कामोर्तब केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयातील निकालामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार दराडे यांच्या मुलाच्या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली. न्यायालयीन निकालामुळे शहरात मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली होती. लग्न सोहळ्यात शिंदे यांच्या समर्थनार्थ आनंदोत्सव साजरा झाला. नंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज सत्याचा विजय झाल्याचे नमूद केले. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील हा विजय आहे. या निर्णयामुळे घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांना मोठी चपराक बसली. राज्यातील सरकारवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून सामान्यांच्या मनातील निर्णय न्यायालयाने दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.