राज्याच्या हितासाठी, स्थिर सरकार असावे म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देत आहोत, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवारी) श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले.
कुकडी कारखान्याचा १२ वा गळीत हंगामाची सुरुवात पवार यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. या वेळी माजी पालकमंत्री आ. मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिक जगताप, आ. राहुल जगताप व संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, प्रदेश सरचिटणीस तुकाराम दरेकर, घनश्याम शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 पवार म्हणाले, की राज्यात कोणत्याच एका पक्षाला बहुमत नाही. मात्र राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. निवडणुकीमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, या जनतेच्या भावनेचा आम्ही आदर करीत, राष्ट्रवादी कॉग्रेसने निकाल लागताच भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्याचे काही पक्षांनी भांडवल केले असे म्हणत त्यांनी कॉग्रेस व शिवसेनेला, नाव न घेता टोला मारला. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यात बदल होणार नाही व आम्ही कोणतीही मागणी न ठेवता पाठिंबा दिला आहे. असेही ते म्हणाले.
ज्यांना उसातील काही कळत नाही, त्यांना शेतकरी संघटनेने ऊस परिषदेला बोलावले आहे व ते आता उसाच्या दराबाबत बोलणार आहेत, असे म्हणत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.  पवार म्हणाले, की उसाच्या दरासाठी शेतकरी संघटना दरवेळी बारामती येथे आंदोलन करीत असे. आता त्यांचे केंद्रात व राज्यात सरकार आहे, मग त्यांनी नागपूर किंवा दिल्ली येथे उसाच्या भावासाठी आंदोलन का केले नाही. सध्या तर गळीत हंगाम उशिरा सुरू होत आहेत. मग यांनी शेतक-यांना वा-यावर का सोडून दिले याचे उत्तर जनतेला द्या, आज साखरेला भाव नाही, त्यामुळे कारखाने अडचणीत आहेत, शरद पवार यांनी कारखान्यांसाठी व शेतक-यांसाठी मदत केली, त्यामुळे सर्व सुरळीत चालत होते, आता कापूस, दूध व सोयाबीनसह कोणत्याच मालाला भाव नाही. मात्र शेतक-यांसाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू. या वेळी आ. मधुकर पिचड, आ. राहुल जगताप, तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा