सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत मोठा धक्का दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
यानंतर मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. “मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि मी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण, दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे. पुन्हा ‘जैसे थे तैसे’ परिस्थिती मराठा समाजाची झाली आहे. आता क्युरेटिव्ह याचिका हा शेवटचा पर्याय उरतो.”
हेही वाचा : श्री सेवकांना पैसे देऊन गप्प केल्याचा संजय राऊतांचा आरोप, शिंदे गटाकडून तक्रार दाखल; म्हणाले, “रोज सकाळी…”
“मराठा समाजाने चार मुख्यमंत्री पाहिले. पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार असताना मराठा आरक्षण मिळालं. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण, कोणत्याही सरकारने मराठा तरुणांना गांभीर्यानं घेतलं नाही. राज्य सरकारने आतातरी गांभीर्याने घ्यावं,” अशी विनंती विनोद पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “पुनर्विचार याचिकेत निकाल लागण्याची शक्यता कमी असते. भोसले कमिटीने केलेल्या सुचनांवर राज्य सरकार काम करत आहे. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुन्हा एकदा याचिका दाखल करायची, असल्यास आम्ही दाखल करू,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.