महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधीच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना परखड शब्दांत फटकारलं होतं. अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रकामुळे सुनावणी दीर्घकाळ लांबण्याची शक्यता असून त्यांनी सुधारित वेळापत्रक सादर करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आज विधानसभा अध्यक्ष न्यायालयात नेमकी काय बाजू मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.
विधानसभा अध्यक्ष जुनंच वेळापत्रक मांडणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले असले, तरी राहुल नार्वेकरांकडून सुनावणीचं जुनंच वेळापत्रक न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मध्ये सुट्ट्यांचे दिवस आल्यामुळे त्या सबबीखाली अध्यक्ष आधीचंच वेळापत्रक सादर करून त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभिप्राय अध्यक्ष घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यासोबतच, विधानसभा अध्यक्षांकडून न्यायालयाकडून लेखी आदेशही मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुपारी होणार सुनावणी!
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील आजच्या कामकाजानुसार दुपारी १२ किंवा एकच्या सुमारास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणीतील दिरंगाईच्या प्रकरणाच्या याचिका सुनावणीसाठी घेतल्या जातील. न्यायालयाच्या वेळापत्रकामध्ये हे प्रकरण २४व्या क्रमांकावर आहे. त्याआधीर समलिंगी विवाहासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय अंतिम आदेश देणार असून त्यानंतर वेळापत्रकानुसार इतर सुनावणी होतील.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना फटकारलं, वाचा नेमकं काय म्हणाले सरन्यायाधीश!
सुधारित वेळापत्रक दिल्यानंतर पुढील अंदाज..
दरम्यान, यासंदर्भात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी टीव्ही ९ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयात पहिला मुद्दा असेल की विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक द्यावं. कारण याआधीच्या वेळापत्रकानुसार सुनावणीला बराच कालावधी लागू शकतो. आज अध्यक्ष सुधारित वेळापत्रक देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार तातडीने सुनावणी घ्या याचा अर्थ न्याय फक्त दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटला पाहिजे असाही आहे. त्यामुळे त्यानुसार वेळापत्रक तयार करावं लागेल”, असं उज्ज्वल निकम म्हणाले.