महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल पाचही न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने दिला असून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी तो वाचून दाखवला. या निकालाच्या वाचनादरम्यान प्रतोद म्हणून शिंदे गटाने केलेली भरत गोगावलेंची नियुक्ती, त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींची भूमिका आणि उद्धव ठाकरेंचा राजीनामा अशा तीन मुद्द्यांवर बोट ठेवलं.
सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानंतर शिंदे सरकार तरलं आहे. कारण हे सरकार जाणार अशा चर्चा होत्या. आमदारांना अपात्र ठरवायचं की नाही हा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांना कोर्टाने दिला आहे. त्या गोष्टीसाठी वेळेचं बंधन नाही. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होतानाच्या अनेक चुकांवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवत हा निकाल दिला आहे. मात्र एक महत्त्वाचं निरीक्षण असंही नोंदवलं आहे की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती जैसे थे करु शकलो असतो. यानंतर चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे शरद पवारांनी लिहिलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीची. शरद पवारांनी या पुस्तकात उद्धव ठाकरेंनी कुणाशीही चर्चा न करता राजीनामा दिला असं आधीच लिहून ठेवलं आहे. नेमकं तेच निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयानेही नोंदवलं.
शरद पवार यांनी लोक माझे सांगाती पुस्तकात उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याविषयी काय लिहून ठेवलंय?
‘महाविकास आघाडी’चं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारेण संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं. ‘महाविकास आघाडी’चं सरकार हे भाजपाला देशभरात मिळालेलं सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे ‘महाविकास आघाडी’च्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला.’
राजकारणातल्या अतर्क्यतेचा अनुभव असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचं वर्णन हे शरद पवार यांनी केलं आहे. २ मे रोजी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. महाविकास आघाडी कशी स्थापन झाली ते सरकार का कोसळलं हे शरद पवारांनी लिहून ठेवलं आहे. नेमकं हेच मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला सुईचे काटे मागे फिरवता आले असते. म्हणजेच परिस्थिती जैसे थे करायला वाव होता असं कोर्टाने म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच उरलं नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना सत्तास्थापनेसाठी बोलवलं. आता आम्हाला परिस्थिती जैसे थे करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आज जो निकाल कोर्टाने दिला आहे त्यात उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला त्याची चर्चा तर होतेच आहे. अशात शरद पवारांनी जे पुस्तकात लिहिलं होतं त्या वाक्यांचीही चर्चा रंगली आहे.