शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांमध्येही पक्षनाव व पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई चालू आहे. यासंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने अजित पवार गटाला थेट सवाल करत शरद पवारांचे फोटो प्रचाराच्या बॅनर्सवर लावण्याबाबत विचारणा केली. याबाबत शरद पवार गटाने घेतलेला आक्षेप मान्य करत तसे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. ‘लाईव्ह लॉ’नं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार गटाचा आक्षेप काय?

वरीष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला. यावेळी याचिकेतील दाव्यानुसार सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात असल्याची तक्रार केली. “अधिकृत मान्यता देण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हाचा वापर करत आहे. हे चिन्ह गेल्या कित्येक वर्षांपासून शरद पवारांशीच संबंधित राहिलं आहे. शिवाय, शरद पवारांचं नाव आणि फोटोही अजित पवार गटाकडून प्रचाराच्या फलकांवर वापरले जात आहेत”, असं अभिषेक मनू सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलं.

यावेळी सिंघवी यांनी छगन भुजबळांचं एक कथित वक्तव्यही न्यायालयासमोर वाचून दाखवल्याचं लाईव्ह लॉनं दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. या वक्तव्यामध्ये छगन भुजबळांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचा फोटो व घड्याळ चिन्ह वापरण्यासंदर्भात मत व्यक्त केल्याचं सिंघवी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला सुनावलं!

दरम्यान, सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला या मुद्द्यावरून सुनावलं. न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातली सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो न वापरण्याचे निर्देश दिले. तसेच, घड्याळ चिन्हदेखील न वापरण्याचा सल्ला दिला.

“तुम्ही त्यांचे फोटो का वापरत आहात? जर तुम्हाला स्वत:वर विश्वास आहे, तर मग तुमचे फोटो वापरा”, असं न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले. त्यावर अजित पवार गटाकडून वरीष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. “आमच्या पक्षाकडून त्यांचे फोटो वापरले जात नाहीत. काही त्रयस्थ सदस्यांनी कदाचित वापरला असावा. कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या सर्व पोस्टवर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे”, असं सिंग म्हणाले.

न्यायालयानं पुन्हा फटकारलं!

दरम्यान, सिंग यांच्या युक्तिवादावर न्यायालयानं पुन्हा एकदा अजित पवार गटाला फटकारलं. “जर तुम्हाला कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट नियंत्रित करणं शक्य होत नसेल, तर मग त्यासाठी कोण जबाबदार आहे? तुम्ही न्यायालयाला लेखी स्वरुपात हे सांगा की तुम्ही शरद पवारांचे फोटो वापरण्यापासून तुमच्या सर्व सदस्यांना थांबवाल. आता तुम्ही दोन स्वतंत्र गट आहात. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या ओळखीचाच वापर करा. तुम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, मग त्यावर ठाम राहा. तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवरणं हे तुमचं काम आहे”, असं न्यायालयानं यावेळूी नमूद केलं. यावर सिंग यांनी अशी लेखी हमी देण्याचं मान्य केलं.

घड्याळ चिन्हाच्या वापरावरही युक्तिवाद

यावेळी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर करण्यावर सिंघवींनी घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने मत नोंदवलं. “आम्ही तुम्हाला हा सल्ला देत आहोत की तुम्ही घड्याळ चिन्हाचा वापर न करता दुसऱ्या कुठल्यातरी चिन्हाचा वापर करा. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर याचिका आलेली आहे. जर आम्ही आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवला, ऐन निवडणुकीच्या मध्यावर आमचा निकाल आला तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न न्यायालयाने केला.

“त्यामुळे शरद पवार गटाकडे वेगळं चिन्ह आहे, तर अजित पवार गटही वेगळं चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही? जेणेकरून न्यायालयाच्या निकालाचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि तुमचं काम तुम्हाला विनासायास करता येईल. या सल्ल्यावर तुम्ही विचार करा”, असं न्यायालयाने नमूद केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या गुरुवारी ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court slams ajit pawar faction for using sharad pawar photos in election campaign pmw