मध्यवर्ती कारागृहात असलेला आरोपी याकुब मेमन याची त्याचा चुलत भाऊ उस्मान मेनन याने सोमवारी भेट घेऊन तासभर चर्चा केली. माध्यमांना मात्र त्याने टाळले. याकुबच्या पुनर्विचार याचिकेवर उद्या, मंगळवारी सुनावणी असली तरी फाशी नागपूर की पुणे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याला मुंबईच्या टाडा न्यायालयाने २००७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेस याकुबने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्व मार्ग चोखाळल्यानंतर आता त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले. याकुब सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असल्याने त्याला ३० जुलैला फाशी दिली जाईल, असा आदेश गृह मंत्रालयाने काढला. मात्र, याकुबने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज केला असून उद्या मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
नियमानुसार फाशी देणार असल्यासंबंधीची सूचना कैद्याच्या जवळच्या नातेवाईकांना १५ दिवस आधी द्यावी लागते. त्याप्रमाणे याकुबच्या पत्नीला सूचना देण्यात आली असून पती याकुबच्या भेटीसाठी तिचा अर्ज एका स्थानिक वकिलामार्फत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनास आज सकाळीच सादर करण्यात आला. ती मुलीसह याकुबची भेट घेणार असल्याच्या वृत्ताने माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळपासून कारागृहासमोर गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता भेटीची वेळ संपली तरी ती आली नव्हती. मात्र, याकुबचा चुलता उस्मान मेमन याने एका स्थानिक वकिलामार्फत याकुबची तुरुंगात भेट घेतली. तासभर ही चर्चा झाली. उस्मान आत गेल्याचे कुणालाच दिसले नाही. अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांचे एक वाहन आले. कारागृहाचे बंद प्रवेशव्दार उघडले गेले. पोलिसांचे वाहन आत गेले. दार बंद झाले. पाच-सहा मिनिटांनंतर दार उघडले गेले. पोलिसांचे वाहन बाहेर आले नि वेगात निघून गेले. पोलिसांच्या वाहनातून याकुबचा चुलता उस्मान गेल्याचे नंतर उघड झाले. माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर उभे असल्याचे उस्मानला समजल्यानंतर त्याने या साऱ्यांना टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले.

Story img Loader