जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून पक्षातील दोन्ही गटांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप वा वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट यांच्यातील संबध कमालीचे ताणले गेले असतानाच त्याचे पडसाद पवार कुटुंबातील वैयक्तिक संबंधांमध्येही दिसत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार व सुप्रिया सुळे आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येऊनही एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळे यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात विचारणा केली असता सुप्रिया सुळेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं कार्यक्रमात?
पुण्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित होत्या. मात्र पूर्ण कार्यक्रमात त्यांचा अजित पवारांशी कोणताही संवाद झाला नाही. यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांनी जाणून-बुजून एकमेकांशी संवाद टाळल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला अजितदादांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यांना जायची घाई होती. ते आलेही उशीरा आणि गेलेही लवकर. मी तर आधीच वेळेवर येऊन बसले होते. मी आले आणि माझ्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अजित पवार उशीरा आले. नंतर त्यांनाच पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर झाला होता. घाईगडबड असू शकते. बिझी लोक आहेत”, अशी सूचक टिप्पणी सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.
बारामतीच्या कार्यक्रमातही अबोला!
दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये झालेल्या नमो रोजगार मेळाव्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुप्रिया सुळे व अजित पवार एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी दोघांचा संवाद होत असताना त्यांनी एकमेकांशी संवाद करणं टाळल्याचं दिसून आलं. त्यावरूनही तेव्हा राजकीय चर्चा घडून आल्याचं पाहायला मिळालं.