Supriya Sule On Relation With Ajit Pawar : बारामतीत आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडीनंतर पवार कुटुंबीयांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्यांचा कोणाशीही दुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर, “मी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या संपर्कात असते, अजित पवार यांच्याशीही बोलते, पण ते माझ्याशी बोलत नाहीत”, असे म्हटले आहे.

बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सुप्रिया सुळे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा कधीच कोणाशी दुरावा नव्हता. आमच्या पक्षामध्ये जे काही झाले त्या दिवसापासून आमच्या तिघांकडून कोणावर टीका झाली असेल तर ते कोणीही सांगावे. माझ्या आई वडिलांनी जे संस्कार केले आहेत, त्यानुसार जगामध्ये कोणाशीही माझा दुरावा नाही.”

मी अजित पवारांशी बोलते पण…

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यात मी कोणाबद्दल कटुता ठेवली नाही. ९९ टक्के आम्ही पवार कुटुंबीय आजही एकमेकांशी बोलतो. सुनेत्रा पवार त्यांची दोन्ही मुले पार्थ आणि जय यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅप आणि फोनच्या माध्यमातून संपर्कात असते. मी अजित पवार यांच्याशीही बोलत असते, पण ते माझ्याशी बोलत नाहीत. मी त्यांना नमस्कारही करते. ते माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांचा सन्मान करते.”

अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, २०२३ मध्ये राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली होती. त्यानंतर राजकीयदृष्ट्या पवार कुटुंबीय वेगळे झाले होते. इतकेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि विधानसभेला अजित पवार विरुद्ध त्यांच्या सख्ये पुतणे युगेंद्र पवार अशी लढत झाल्याचेही पाहायला मिळाले होते.

Story img Loader