Supriya Sule and Pankaja Munde Meet : राजकीय टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या विरोधकांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध असल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर अवघ्या राज्याला माहितेय. बीड प्रकरणात या दोघींनीही एकमेकींविरोधात भूमिका घेतली. मात्र, बारामतीतील एका कार्यक्रमात एकमेकींना पाहिल्यावर दोघींनी कडकडून मिठी मारली. हस्तांदोलन केलं, क्षणभर गप्पाही मारल्या. हे सर्व खुल्या व्यासपीठावर झालं, जे अनेकांच्या कॅमेऱ्यातही कैद झालं.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार पंकजा मुंडे, क्रीडा-युवक-कल्याण-अल्पसंख्याक विका व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे व्यासपीठावर येताच सुप्रिया सुळे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. दोघींनी हस्तांदोलनही केलं. तेवढ्यात सुनेत्रा पवारही व्यासपीठावर आल्या. सुनेत्रा पवारांनी फक्त पंकजा मुंडेंकडे पाहून हास्य केलं. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काही संवाद झाला नाही. हे सर्व घडत असताना अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते. शेवटी पंकजा मुंडे आणि सुनेत्रा पवार आपल्या जागेवर स्थानापन्न झाल्या. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या दिलखुलास भेटीमुळे कार्यक्रमस्थळी अनेक चर्चा रंगली होती.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात विसंवाद
याच कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवारांनी पंकजा मुंडे यांचा भगिनी असा उल्लेख केला. तर, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख लोकसभा सदस्य असा केला. बैठक व्यवस्थेतही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात अंतर राखण्यात आलं होतं. एकाच कुटुंबातील दोघेजण एकाच व्यासपीठावर आलेले असतानाही दोघांनीही एकमेकांशी संवाद करणं टाळलं.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित २३ व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धे’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. यावेळी अजित पवारांनी स्पर्धेत सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि कबड्डी रसिकांशी संवाद साधत राज्यातील देशी खेळांचा प्रचार व प्रसार तसेच खेळाडूंच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डी, खो-खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचे वार्षिक अनुदान वाढवून ते एक कोटी रुपये करण्याची घोषणा करत, सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.