Supriya Sule And Sharad Pawar Schedule : राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीची जोडी केंद्रस्थानी राहिली आहे. दोघेही संसदेत खासदार असले तरीही राज्याच्या राजकारणावर त्यांचा पगडा कामय राहिला आहे. त्यामुळे हे बाप-लेक वैयक्तिक आयुष्यात कसे असतील? त्यांच्या राजकारणाव्यतिरिक्त कोणत्या विषयावर संवाद होत असतील? याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये नेहमीच उत्सुकता आहे. याविषयी त्यांनी आज दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते.
दिवसभरात तुमच्यात काय चर्चा होते? सकाळच्या भेटीत काय बोलता? आदी प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबा सकाळी सहा वाजता उठतात आणि मी सात वाजता उठते. मी उठून जाईपर्यंत बाबांचा पहिला पेपर वाचून झालेला असतो. आमचं पहिलं संभाषण काय गुड मॉर्निंग वगैरे नसतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेल्यावर ते त्यांचा वाचून झालेला पहिला पेपर माझ्या हातात देतात. दोन तीन पत्रकार आहेत, ज्यांना आम्ही रोज फॉलो करतो. त्यांच्या बातम्या वाचून गेले असेन तर त्यांच्या बातम्यांवर किंवा अग्रलेखावर चर्चा करतो. जेव्हा केव्हा आम्ही भेटतो, जेव्हा आमची पहिली भेट होते, तेव्हा वर्तमान पत्र हा आमचा कनेक्टिंग पॉइंट असतो.”
हेही वाचा >> Sharad Pawar : “मला माझ्या बोटावर विश्वास, माझं बोट कोणाच्याही हातात देत नाही”, शरद पवारांकडून मोदींची फिरकी
सकाळच्या पहिल्या तीन तासांत राजकारणावर चर्चा करून घेतो
“सकाळचे पहिले तीन तास माझ्या आईला बोललेलंच आवडत नाही. त्यामुळे सकाळी ७ ते १० आम्हीच बोलतो. सकाळी तीन तासांत राजकारण विषयावर चर्चा करून घेतो”, असंही सुळे म्हणाल्या. तुम्ही नियमित वाचत असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये सामना असतो का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आम्ही सर्व पेपर वाचत असतो. पण आमचा पहिला पेपर सारखाच आहे.”
आता अग्रलेख वाचावे वाटत नाहीत
“सामनाचा अग्रलेख वाचता का?” यावर शरद पवार म्हणाले, “हल्ली अग्रलेखात फारसं लक्ष द्यावं असं वाटत नाही. त्याचं कारण माझ्या आयुष्यातला एक काळ असा येऊन गेला की, द्वा. भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, र. ना. लाटे, पा. वा. गाडगीळ, म्हणजे काही घडलं की आज गोविंदरावांनी काय लिहिलं हे वाचण्याची उत्सुकता असायची. हल्ली तशी ओढ नसते.”