Supriya Sule On Air India : विमान प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा विमानाला उशीर होतो, त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करतात. मात्र, तरीही काहीही पावलं उचलली जात नाहीत. मात्र, आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण असाच अनुभव खासदार सुप्रिया सुळे यांनाही आला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.

एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाबाबत नाराजी व्यक्त करत विमानाला उशीर होणं हे कायमचंच झालं आहे. प्रवाशांना मनस्तापाला सामोर जावं लागत असून हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं?

“एअर इंडियाच्या विमानांना अविरत विलंब होत आहे, हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रीमियम भाडे देतो, तरीही विमाने कधीच वेळेवर येत नाहीत. व्यावसायिक, मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच या सततच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसतो. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना कारवाई करण्याचे आणि एअर इंडियाला जबाबदार धरण्याचे आवाहन आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला एअरलाइनच्या सततच्या गैरव्यवस्थापनाच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. तसेच संबंधित एअरलाइन्सना जबाबदार धरण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे केली आहे.

एअर इंडियाने काय म्हटलं?

खासदार सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विलंबाबाबत केलेल्या पोस्टला उत्तर देताना एअर इंडियाने म्हटलं की, “आम्हाला माहित आहे की विलंब खूप निराशाजनक असू शकतो. तथापि कधीकधी आमच्या नियंत्रणाबाहेरील ऑपरेशनल समस्या असतात, ज्या फ्लाइट वेळापत्रकावर परिणाम करू शकतात. अशा समस्येमुळे आज संध्याकाळी तुमचे मुंबईला जाणारे विमान एक तास उशिरा पोहोचले. आम्ही तुमच्या समजुतीचे कौतुक करतो”, असं एअर इंडियाने दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

Story img Loader