Supriya Sule : राखी पौर्णिमेचा सण नुकताच देशभरात उत्साहाने साजरा झाला. या सणाच्या दिवशी चर्चा होती ती अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची. अजित पवारांना तुम्ही राखी बांधलीत का? हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) मी नाशिक दौऱ्यावर होते असं उत्तर दिलं. तसंच संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. बदलापूरची घटना आणि साताऱ्याच्या घटनेबाबत सुप्रिया सुळेंनी चिंता व्यक्त केली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महायुतीच्या सरकारमध्ये इंटेलिजन्स नावाची काही यंत्रणा आहे की नाही? काहीही घडलं की विरोधी पक्षांवर खापर फोडण्यात येतं. सरकारपेक्षा विरोधी पक्षांची ताकद जास्त झाली आहे का? जर हे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरणार असेल तर नैतिकता राहिली आहे का सरकारमध्ये यांना राहण्याची? असा सवाल सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) विचारला आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
महाराष्ट्रात इतकं असंवेदनशील सरकार पाहिलं नाही
घरं फोडायची, पक्ष फोडायचे, ईडीचा तपास लावायचा या सगळ्यात या सरकारचा वेग प्रचंड आहे. ICE म्हणजेच इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यांच्या कारवाया विरोधकांच्या विरोधात करायच्या असतील तर त्या वेगाने होतात. मग जनतेचे प्रश्न वेगाने का सोडवत नाही? बाकी सगळ्या बाबतीत सरकार नापास झालं आहे. महाराष्ट्रात मी इतकं असंवेदनशील सरकार कधी पाहिलं नाही. असंही सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल टॅक्सीतून का गेले? याबाबत चिंता व्यक्त केली.
हे पण वाचा- बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळेंनी उत्तर देणे टाळले
अजित पवार, तटकरे टॅक्सीने का गेले?
“माझी सव्वा वर्ष दादाशी भेट नाही. काल-परवाकडे मी त्यांना टॅक्सीमध्ये पाहिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे तिघंही टॅक्सीने गेले. तिघांचीही गाडी एकाच वेळी बंद पडली असेल तर हा चिंतेचा विषय आहे. या मागे काही षडयंत्र तर नाही ना? हे तपासावं लागेल. बातमी बघितल्यावर मला काळजी वाटली. तिघांच्या कार बंद झाल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे. ते टॅक्सीने का गेले?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

मी अजित पवारांशी संपर्क केला पण…
राखी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांना राखी बांधली का? किंवा संपर्क केला का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी राखीच्या दिवशी नाशिकला होते. मला त्यांचा काही फोन आला नाही. मी काही मेसेज पाठवले होते पण त्याचं काही उत्तर आलं नाही. मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण मला काही उत्तर आलं नाही. त्यांनी का उत्तर दिलं नाही? याचं उत्तर मी कसं देऊ? राखी पौर्णिमेला अजित पवारांना अडीच लाख राख्या आल्या तर चांगलं आहे. आमची फॅमिली मोठी होते आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.