Supriya Sule : बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसंच या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. सुप्रिया सुळे यांनीही अशीच मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवलं आहे गेल्या काही दिवसांपासून. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण ३१ दिवस लावून धरलं आहे. कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं. आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
हे पण वाचा- “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या…
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नैतिकता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आत्तापर्यंत ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळेच दिले. आपण थोडावेळ बाजूला झालं पाहिजे. सुरेश धस म्हणाले की चौकशी सुरु आहे तोपर्यंत मंत्रिपदासून बाजूला व्हा. क्लिन चिट मिळाली तर या परत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे. बजरंग सोनावणे यांची मागणी, अनेक पत्रकारांची मागणी आहे. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. नैतिकता म्हणून लोकप्रितिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे. सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याचं. मग सेवा कुठे गेली? पंतप्रधान हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवत आहेत. मग त्यांच्या टीममधले सहकारी कसे वागत आहेत?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.
सगळे राजकीय पक्ष राजकारण विसरुन न्याय मिळाला पाहिजे म्हणून एकत्र आले आहेत
सगळे राजकीय पक्ष मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणावर राजकारण बाजूला ठेवून न्याय मागत आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. जो अन्याय देशमुख कुटुंबावर झाला आहे किंवा सूर्यवंशी कुटुंबावर झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. सगळ्या पक्षांचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले आहेत असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अमित शाह यांनी जी टीका शरद पवारांवर केली. त्याकडे मी अशाच दृष्टीकोनातून पाहते की महाराष्ट्रात आल्यानंतर हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्यावरच होते हे अमित शाह यांना समजलं असावं. बाकी लोकशाही आहे त्यांना जे बोलायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.