महाराष्ट्रातल्या बदलापूर या ठिकाणी एका प्रतिथयश शाळेत दोन मुलींवर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याला फाशी द्या या मागणीसाठी बदलापूरमध्ये रास्ता रोको आणि रेल रोको करण्यात आला होता. २३ सप्टेंबरला पोलीस चकमकीत मृत्यू झला. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. मुंबईत एक पोस्टर लागलं होतं. या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस हाती बंदुक घेऊन आहेत. तसंच बदलापुरा असं या पोस्टरवर म्हटलं आहे. ज्यावरुन सुप्रिया सुळेंनी जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

“मला सगळ्यात जास्त दु:ख एका गोष्टीचं झालं. देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, आणि राज्य आहे. त्यामुळेत देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही अथून देवेंद्रजींना संविधान दाखवू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी असे बंदूक घेतलेलं बॅनर लहान मुलं बघतील तेव्हा काय म्हणतील, अक्षय शिंदे एन्काऊंटर वरून देवेंद्र फडणवीस यांचे बंदूक धरलेले पोस्टर व्हायरल झालं आहे. त्यावर आज सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या महिलेसाठी हे फार धक्कादायक आहे. जी लहान मुलं ते पोस्टर बघतील, त्यांच्यावर काय संस्कार होतील. या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस ते मिर्झापूर टिव्ही सिरिज मध्येच या गोष्टी चालतात. बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, असंही सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पुढे म्हटलं आहे.

काय आहे बदलापुराच्या पोस्टरमध्ये?

मुंबईतल्या काही भागांमध्ये ‘बदलापुरा’ हे लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर ‘बदला पुरा’ असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. दुसरीकडे या पोस्टरवरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटल्या. आता बदलापुराची चर्चा रंगली आहे.