Supriya Sule Beed Visit : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आता अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. राज्यात बीडमध्ये एवढ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी, आई आणि मुलीशी संवाद साधला. तसंच, गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या. यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोणाला पटतंय का की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही. त्याचा सीडीआर काढा. फोन असा जातो कुठे? कृष्णा आंधळे आणि इतर आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे. यासाठी आपण लढा लढू”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “ही लढाई महिलांनी हाती घेतली पाहिजे. घ्या हातात लाटणं. आमच्या घरातील पुरुषावर असे अन्याय करता? हा महाराष्ट्र असं सहन करणार नाही. तुम्ही अन्नत्याग करू नका, ही विनंती करते. वेळ पडली तर आम्ही अन्नत्याग करू.”

“त्या तानाजी सावंतंचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? तो गरीब, शोषित, पीडित आहे म्हणून आवाज नाही का त्याला? जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही, दोन्ही मुलांची जबाबदारी पवारांनी घेतली आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी शब्द देते की…

“मी या मुलीला, आईला आणि आजीला शब्द देते की या बीडमधील सर्व मस्ती उतरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशांची ही मस्ती आहे. आपण एकत्रपणे ताकदीने लढू. कोर्ट केस मी लढेन. मी जशी राज्यात आणि देशात बिंधास्त फिरते तसं प्रत्येक महिला फिरली पाहिजे”, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी गावकऱ्यांनी बीडमधील आणि आजूबाजूच्या गावातील दहशतीबाबत माहिती सुप्रिया सुळेंना दिली. पोलिसांनी कशाप्रकारे हयगय करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, याची माहितीही दिली. आजूबाजूच्या गावातील इतर गुन्ह्यांविषयीही गावकऱ्यांनी सांगितलं. एकूणच बीडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती चिघळल्याची अनेक उदाहरणं गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना दिली असून या सर्व प्रकरणात महिला म्हणून गावकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच, या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून फार अपेक्षा होत्या. त्यांच्या भेटीची वेळ मागितली असून बजरंग सोनावणे आणि मी जाऊन त्यांची भेट घेणार आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.