Supriya Sule on Rituals : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पांडुरंगाच्या निस्सिम भक्त आहेत. या भक्तीसाठी त्यांना घरातून कोणीही शिकवण दिलेली नाही. त्यांची आणि त्यांच्या पांडुरंगांचं नातं कसं जमलं हे त्या दोघांमध्येच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. विषय खोल या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
“माझी आई आणि सासू या मर्यादित श्रद्धाळू आहेत. माझ्या आजी शारदाबाई पवार नवरात्रीनिमित्त नऊ दिवसाचे उपवास धरायच्या. त्यानंतर माझ्या आईने हे उपवास धरायला सुरुवात केली. मी अनेकवेळा आईला म्हणते की मी आता हे उपवास धरते. पण आई म्हणाली की करायला काहीच हरकत नाही. पण तुमच्यासारखी लोक अखंड घराच्या बाहेर असतात. तुमचं काम सतत सुरू असतं. उपवासाच्या दिवशी प्लानिंग करायचा तुलाही त्रास आणि जिथे जाणार त्यांनाही त्रास. तुम्ही बाहेर प्रोफेशनल्स आहात, त्यामुळे तुम्ही करू नका. तुला मनापासून जे करायचं आहे ते कर. त्यामुळे ३६५ दिवस मी खरंच उपवास धरत नाही”, असं सुप्रिया सुळे सुरुवातीला म्हणाल्या.
माझी पांडूरंगांवर भाबडी श्रद्धा
पुढे त्या म्हणाल्या, “माझी अंधश्रद्धा कशावरच नाही, पण प्रचंड श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे. पांडुरंगाला भेटण्यासाठी माझी इच्छा असते तेव्हा मी जाते. हे माझं भाबडं प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे. ही माझी श्रद्धा मी सदानंद, रेवती आणि विजयवरही लादत नाही. इच्छा नसेल तर मी कोणतीही गोष्ट कोणावरही लादत नाही. माझ्या आई वडिलांनीही माझी श्रद्धा ठरवली नाही. माझं आणि पांडुरंगाचं नातं कसं जमलं हे आमच्या दोघांमध्येच आहे.”
जावयाचे पाय का धुवावेत
त्यांनी पुढे अधिक महिन्यातील जावयाच्या पाय धुण्याच्या प्रथेवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मी एक रील पाहिला. त्या लग्नाला मी गेले होते. या रीलमध्ये जावयाचे पाय धुतले जात होते. दर अधिक महिन्यात जावयाला घरी बोलवायचं आणि त्याला गिफ्ट देऊन त्याला ओवाळायचं. मी ठरवलं की असली जेवणं बारामती लोकसभा मतदारसंघात आणि छत्रपतींच्या पुरोगामी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. त्यापेक्षा लग्न झाल्यानंतर अधिक महिना येईल तेव्हा जोडप्याने आपल्या आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना बोलवावं, त्यांचे पाय धुवावेत आणि त्यांना जेवू घालावं आणि त्यांना गिफ्ट द्यावं. हे आपण बदललं पाहिजे. आपण सिलेक्टिव्हली वेस्टर्न आणि इस्टर्न संस्कृती घेतो.”