एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला असली तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टप्पणी केली आहे. घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. ”टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका
“अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत,” अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
शिंदे सरकारमध्ये कोण नाराज?
मंत्रीपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदीपान भुमरे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे, असे म्हटले जात आहे. नाराजीच्या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा >>> “३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या”, कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं!
मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट, बच्चू कडू नाराज
पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून एकनाथ शिंदे-भाजपा यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनादेखील पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. याच कारणामुळे शिरसाट यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्त केली होती.