राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील तीन सेकंदांचा एक व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरून ट्विटरवर भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे म्हणत आहेत, “आणि गद्दारी तर महा… महारा…महाराष्ट्राच्या रक्तातच”, भाषणाचा हाच भाग दोन वेळा जोडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या तर रक्तात गद्दारी आहे” हे बोलून सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
भाजपाच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे की, “असे अर्ध्यात काटछाट केलेले सहा सेकंदाचे व्हिडीओ टाकून जनतेची दिशाभूल करणे थांबवून हा पूर्ण व्हिडीओ भाजपाने ट्विटरवर टाकण्याची हिम्मत दाखवावी. असे फुकटचे एडिटिंग ॲप्स बाजारात रोज येत असतात!”
सुप्रिया सुळे ५ जून रोजी इंदापूरमधील बोराटवाडी या गावच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्या अडखळल्या. त्यातलाच तीन सेकंदांचा भाग दोन वेळा जोडून सहा सेकंदांचा व्हिडीओ ट्विटवर भाजपाने शेअर केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
यानंतर या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गद्दारी करण्यासाठी आमदारांना भाजपाने प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले. ४० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये म्हणजेच २,००० कोटी रुपये दिले. २,००० कोटी रुपयांसाठी यांनी गद्दारी केली. आपलं सरकार पडलं नसतं आणि ते दोन हजार कोटी रुपये इंदापूरमध्ये आले असते तर तुमच्या आयुष्यात किती बदल झाला असता.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन हजार कोटी रुपयांची त्यांनी घरं घेतली, गाड्या घेतल्या, बायकोला दागिने केले. आपल्या सरकारने मात्र या पैशात विकास केला असता, रस्ते बांधले असते, चांगल्या एसटी तुमच्या सेवेसाठी आणल्या असत्या, चांगल्या शाळा आणि आरोग्य केंद्र उभारली असती. यांनी २,००० कोटी रुपयांसाठी गद्दारी केली, गद्दारी तर महा..महारा..महाराष्ट्राच्या रक्तातच आहे, आणि हा आपला महाराष्ट्र आहे. मराठी माणसाचा…मराठी माणूस म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो, पण यांनी गद्दारी केली आहे.
हे ही वाचा >> VIDEO : मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने अटक केल्यावर ऊर्जा मंत्री ढसाढसा रडू लागले, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या शिंदे सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांच्या इच्छेविरोधात हे शिंदे सरकार तयार झालं आहे. आपल्या राज्यात यशवंतराव चव्हाण होऊन गेले. हिमालयाला गरज पडेल तेव्हा सह्याद्री मदतीला धावून जाईल असं ते म्हणायचे. चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना बोलावून घेतलं, तेव्हा ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. परंतु आत्ताच्या सरकारचं काय, तिकडे हिमालयाने डोळे वटारून पाहिलं की आपला सह्याद्री घाबरला. दिल्लीने हाक मारली के हे पळतंय तिकडे. यांच्या स्वाभिमानाला काय झालंय.