सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना केली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिरसाट हे सरकारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे का? असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “संजय शिरसाटांनी वापरलेली भाषा…”, सुषमा अंधारेंबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून रूपाली पाटलांची टीका

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील, तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“…म्हणून त्यांना पाठीशी घालत आहे का?”

“बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल, तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारी पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – संजय शिरसाटांवर काय कारवाई झाली? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “४८ तासांत…”

शिरसाटांविरोधात कारवाईची मागणी

“आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग किंवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.