वेदांता कंपनीने आपला सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारचे निर्णय हे दिल्लीतून होत असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

हेही वाचा – Municipal Election: शिंदे गटासोबत युती करणार? मनसेकडून मोठं विधान, म्हणाले “आमचे निर्णय भाजपा…”

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“केंद्र सरकारकडून सध्या महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं काम सुरू आहे. राज्यातलं सरकार हे शिवजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले. पण छत्रपती कधी दिल्लीपुढे झुकले नाहीत. मात्र, आताचे सरकार सातत्याने दिल्लीपुढे झुकते आहे. दिल्ली म्हणेल तसे निर्णय घेणं सुरू आहे. शिंदे गटाचे सर्व निर्णय दिल्लीतून घेतल्या जात आहेत. हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. हे अत्यंत दुर्देवी आहे” , अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project: “…त्यामुळे प्रकल्प गुजरातमध्ये” गेल्याचं सांगत अजित पवारांचं CM शिंदेंना पत्र; विनंती करत म्हणाले, “महाराष्ट्राच्या…”

“५० खोक्यांचं राजकारण जे महाराष्ट्रात सुरू आहे, ते आज देशभरात पसरवलं जाते आहे. हे भारतीय संविधानाच्या विरोधात सुरू आहे. येणाऱ्या काळात याचे वाईट परणाम बघायला मिळतील”, असेही त्या म्हणाल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

Story img Loader