NCP Hasan Mushrif ED Raid : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरंच काहीही नाही. अतिथी देवो भवं, आमच्याकडे पाव्हणे आलेत त्यांचे स्वागत करुच.”, अशी प्रतिक्रिया देत असताना त्या म्हणाल्या की राज्यात ईडी म्हणजेच एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

कटकारस्थानं करण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीवर लक्ष द्या

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, “एक गोष्ट प्रांजळपणे मला या ईडी सरकारला सांगायची आहे. ही अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाई यावर लक्षं दिलं तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल. नुकतीच एक बातमी प्रकाशित झाली होती, ज्यामध्ये आरटीआयद्वारे अशी माहिती समोर आली की, देशातील ९० ते ९५ टक्के विरोधी पक्षांतील लोकांवर धाडी पडल्या आहेत किंवा त्यांच्यावर आरोप झालेले आहे. महाराष्ट्राचे सरकार तर अभिमानाने स्वतःला ईडी सरकार म्हणजेच एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार असल्याचे म्हणतात. जे त्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशी कारवाई झाल्याचे वारंवार दिसत आहे.”

हे देखील वाचा >> ED Raid: कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर जयंत पाटील यांचे सूचक विधान; म्हणाले, “अशा कारवाया करणाऱ्या यंत्रणांनी…”

बातमीत राहाण्यासाठी शरद पवाराचं नाव घेतलं

किरीट सौमय्या यांच्या आरोपाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर इतके लोक आरोप करतात कारण त्याशिवाय त्यांची हेडलाईन होत नाही. माझे त्यांना नम्रपणे आवाहन आहे की, तुम्ही या गोष्टी करत राहा. हा तुमचा अधिकार आहे. पण सत्तेचा गैरवापर करण्याची परिसीमा या सरकारने गाठली आहे.

हे ही वाचा >> Hasan Mushrif ED Raid : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

हसन मुश्रीफ घरी नाहीत, अशी बातमी येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की, या अशा राजकारणामुळे कुटुंब भरडलं जातं. त्या कुटुंबातील मुली, नातू कोणत्या परिस्थितीतून जातात, याचा विचार कुणीही करत नाही. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल, याचा विचार केला नव्हता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticized shinde fadnavis government over hasan mushrif ed raid kvg