‘न्यूजक्लिक’चे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ आणि संस्थेचे मनुष्यबळ विभागप्रमुख अमित चक्रवर्ती यांना दिल्ली न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केलं होतं. पूरकायस्थ आणि चक्रवर्ती या दोघांवर चीनच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी परदेशातून बेकायदा पैसे घेतल्याच्या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (३ ऑक्टोबर) ‘न्यूजक्लिक’शी संबंधित पत्रकारांसह ३० ठिकाणांवर छापेमारी केली होती. दिवसभर या पत्रकारांची आणि न्यूजक्लिकशी संबंधित लोकांची चौकशी केली आणि दिवसअखेरीस प्रबीर पूरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक केली.
‘न्यूजक्लिक’ आणि पत्रकारांवरील कारवाईवर ‘लोकसत्ता’ने आजचा अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी हा अग्रलेख मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. तसेच मोदी सरकारवर टीकाही केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, ‘न्यूजक्लीक’शी संबंधित पत्रकारांवर दिल्ली पोलीसांनी छापे टाकून त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले. ही कारवाई करत असताना संबंधित माध्यमसंस्थेला एफआयआरची प्रत (दखलपात्र गुन्ह्याची माहिती असलेला अहवाल) देण्यात आलेली नाही. नेमक्या कोणत्या कारणांसाठी ही कारवाई केली याबाबतीतही निश्चित आणि स्पष्ट असे उल्लेखही करण्यात आलेले नाहीत. मुळात आपल्या भल्याबुऱ्या कामगिरीचे सदैव कोडकौतुकच केले जावे, गोडवे गायले जावे. माध्यमांनी यांची चिकित्सा करण्यापेक्षा थेट ‘पीआर’ करावा अशी भाजपा सरकारची अपेक्षा आहे.
वाचा >> आजचा अग्रलेख:‘जननी’चे लज्जारक्षण!
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सरकारच्या धोरणांवर टीकाटिपण्णी करुन जबाबदार माध्यमाची भूमिका पार पाडणारा प्रत्येक आवाज चिरडून टाकण्याचा पराक्रम भाजपाचे हे सरकार नेहमी करते. आत्ममुग्धतेत रमलेल्या भाजपाने असा पळपुटेपणा करण्यापेक्षा उघडपणे आणीबाणी जाहीर करण्याची हिंमत तरी दाखवावी.