राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे. याचसंदर्भात रविवारी उस्मानाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडून प्रसारमाध्यमांना एक विनंती केली.

नक्की वाचा >> “वहिनी कान्सला जातील आणि…”; सुप्रिया सुळेंना स्वयंपाक करण्याचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना महिला आणि बालविकास मंत्र्यांचा टोला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय?
ओबीसी आरक्षणाच्या मागणीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले होते. आरक्षण देण्यासाठी ‘दिल्लीला जा, नाहीतर मसणात जा, देता येत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा’ असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर गेले काही दिवस सर्व स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वक्तव्याबद्दल पाटील यांच्यावर टीका झाली होती.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुन्हा दाखल केल्यावर…”; NCP कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवरही केलं भाष्य

माफी मागताना पाटील काय म्हणाले?
या पार्श्वभूमीवर पाटील यांनी महिला आयोगाला पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली. आयुष्यातील ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर ‘स्वयंसिद्धा’, ‘हेल्पर्स ऑफ हँडीकँप,’,‘सावली’, ‘आई’, ‘संवेदना व वात्सल्य’ सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचा मी प्रदेश अध्यक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रिया सुळे व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दु:ख नाही, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

नक्की वाचा >> चंद्रकांत पाटलांच्या ‘घरी जाऊन स्वयंपाक करा’ टीकेनंतर मिळालेल्या पाठिंब्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुढारलेल्या…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांना याच माफीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अगदी हात जोडून प्रसारमाध्यमांना एक विनंती केली. “त्यांनी दिलगीरी व्यक्त केलीय. आपण आता याकडे कसं पाहता,” असा प्रश्न पत्रकाराने सुप्रिया सुळेंना विचारला.

“एक तर पहिल्यापासूनच मी या विषयावर काहीही बोलेले नाहीय. मला असं वाटतं की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर काही वक्तव्य केलं असेल, त्यावर काही बोलले असतील तर माझी विनम्रपणे सगळ्या मिडियाला विनंती आहे की यावर आपण सगळे मिळून पडदा टाकूयात,” असं सुप्रिया यांनी हात जोडून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule first comment as maharashtra bjp chief chandrakant patil apologises for go home and cook remark scsg