खासदार सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुळेगाव तांड्यामध्ये सुरु केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रमास भेट दिली. या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी बंजारा समाजाच्या महिलांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शिवणकाम, विणकाम, नक्षीकाम शिकवणीची पहाणी केली. सुप्रिया यांनी या महिलांच्या कामाचं कौतुक केलं. सुप्रिया सुळेंनी भारत बनवलेल्या म्हणजेच मेड इन इंडिया वस्तू वापरण्याचा सल्ला यावेळी आपल्या भाषणामध्ये दिला.
“मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्ही महाराष्ट्रातील पोलिसांवर जो विश्वास दाखवला आहे. सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण जिल्ह्यामधील महिलांच्या आयुष्यात जो बदल होतोय,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “एक परिवर्तनाचा प्रयोग त्यांनी करुन पाहिला. तो येथे यशस्वी होताना दिसतोय. याचं जेवढं श्रेय पोलीस यंत्रणेला जातं तेवढं तुम्हा सर्वांना जातं,” असं म्हणत या महिलांचं कौतुक केलं.
“फार सुंदर वस्तू तुम्ही केल्या आहेत. तुम्ही बिझनेस वुमन झाला आहात. बंजारा समाजाच्या असण्याचा अभिमान आहेच पण पहिल्यांदा तुम्ही बिझेन वुमन आहे हे तुम्ही म्हणायला शिकलं पाहिजे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. “एक महिला भगिनी मला सांगत होत्या की त्यांनी बनवलेला शर्ट दुबईला जाणार आहे. तर मी सर्व सहकाऱ्यांना सांगते की सुट्टीला दुबईला वगैरे जात बसू नका. पैसे वाचवा. एलोरा अजंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला,” असं आवाहनही त्यांनी केलं. मी सर्व गोष्टी मेड इन इंडियाच वापरते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच बाजारामध्ये ज्याची मागणी आहे अशा कपड्यांचं उत्पादन घ्या. त्यासाठी मुंबईमधील चांगले डिझायनर्स मी तुम्हाला सल्ला देण्यासाठी घेऊन येईल असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पुढील कार्यक्रमांना नेत्यांऐवजी चार पाच चांगले डिझायनर्स बोलवा, त्याचा या महिलांना अधिक फायदा होईल, असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी पोलिसांना दिला.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “ऑपरेशन परिवर्तन उपक्रम कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे,” असं सांगितलं. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनच्या उपक्रम आपल्याला फारच आवडल्याचंही त्या म्हणाल्या. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.
सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला त्यांनी भेट देण्यापूर्वीच त्यांनी या उपक्रमाचे लोकसभेतही कौतुक केले होते. या उपक्रमानुसार हातभट्टी दारू तयार करणाऱ्या महिलांच्या हातात शिलाई मशीन आले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा त्याच्या धोरणामुळे परिवर्तन होत असेल तर निश्चितच ते आनंददायी असते, असे या उपक्रमाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या. जिथे जिथे चांगली कामे होतात, त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.