“जर बारामतीची जागा आमच्याकडे आली, तर तिथून सुनेत्रा पवार उमेदवार असतील”, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नसून पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असतानाच दुसरीकडे शुक्रवारी बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बंडानंतरचं वितुष्ट!
‘आता फाटलंच’ असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकसंघ होण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे अजित पवारांच्या बंडखोरीपासून कमालीचं वितुष्ट राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालं आहे. निवडणुकीत एकमेकांना मोठ्या फरकानं पराभूत करण्याचे दावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. त्यात एकमेकांवर प्रसंगी जिव्हारी लागणारी टीकाही केली जात आहे. खुद्द सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बारामतीमध्ये घडलेला प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. “आपल्या सुखदुखात कोण असेल अशाच लोकांना मतदान करा. मी जी मतं मागतेय ती मेरिटवर मागतेय. आणि मी मते मागतेय, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाहीय. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरतेय. आणि असंच असलं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघ आढावा: बारामतीत कोणत्या पवारांचे वर्चस्व ? सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवाराची उत्सुकता
काय घडलं बारामतीमध्ये?
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून बारामतीमध्ये बॅनरबाजीही झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसमोर अवघड आव्हान उभं करणार असल्याचं बोललं जात असताना बारामतीच्या जळोचा काळेश्वर मंदिरात वेगळंच दृश्य दिसून आलं. या मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे गेल्या असता सुनेत्रा पवारही तिथे दर्शनासाठी उपस्थित होत्या. त्यामुळे गाभाऱ्याजवळ या दोघींचा आमना-सामना झाला. आता पुढे काय होणार याची उत्सुकता तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती.
“मतं मागायला मी सदानंद सुळेंना फिरवत नाही, स्वतःच्या मेरिटवर…”, सुप्रिया सुळेंची टीका; रोख कोणावर?
गाभाऱ्याजवळ उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे स्मितहास्य करत सुप्रिया सुळेंनी त्यांची गळाभेट घेतली. दोघींनी एकमेकींची आपुलकीनं विचारपूस केल्याचं या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी गाभाऱ्यात दर्शनही घेतलं. या दोघींसाठी तो काही क्षणांचा आमना-सामना असला, तरी त्यातून बारामतीमध्ये असंख्य चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे.