निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांनीही त्याच धर्तीवर निकाल दिला आहे. गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी राहुल नार्वेकर यांनीही यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये अजित पवार गटालाच मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल शिवसेनेच्याच निकालाप्रमाणे लागल्याचं बोललं जात आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असतानाच त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
बारामतीमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार?
सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून अजित पवार यांनी आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्यावर त्यांनी ही आपली वैचारिक लढाई असल्याचं सांगितलं. “मला माहिती नाही. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही. माझी ही वैचारिक लढाई आहे. लोकशाहीत ही लढाई केलीच पाहिजे. त्यात गैर काय?” असा प्रश्न त्यांनी केला.
राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीमधील कार्यालयांवर दावा सांगणार का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली. “माझा स्वभावच हक्क दाखवण्याचा नाहीये. हक्क दाखवण्यात काय मजा आहे. लोकांचं प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नार्वेकरांच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल घटनाबाह्य असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमचं घर वडिलांच्या नावावर असतं. वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही? आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यांनी वडिलांसाठी १४ वर्षांसाठी वनवास भोगला. त्या रामाचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान करणं हे संस्कार आमच्यावर झाले आहेत. माझ्या आई-वडिलांचं लग्नही रामाच्या मंदिरातच झालं आहे”, असं त्या म्हणाल्या.
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
“मी अहवाल वाचलेला नाही. पण जरांगे पाटलांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे असंवेदनशील ट्रिपल इंजिन खोके सरकारला मी विनंती करेन की जरांगे पाटलांशी तातडीने चर्चा करावी. मराठा समाज, धनगर, लिंगायत, मुस्लीम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांचा गांभीर्याने सरकारने विचार करावा. त्यातून मार्ग काढावा. सरकारने आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही पूर्ण ताकदीने सरकारसोबत उभे राहू”, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.