गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी समुदायातील असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक जात प्रमाणपत्र कारणीभूत ठरलं आहे. हे जात प्रमाणपत्र शरद पवारांचं असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला असून त्यावरून शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शरद पवार गटाकडून या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दावाच मुळात हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शरद पवारांच्या दाखल्यावर ‘ओबीसी’ असा उल्लेख असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, असा उल्लेख असणारं प्रमाणपत्रच मुळात बनावट असून हा त्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय. हे षडयंत्र अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रातल्या अशा लोकांना कुठूनतरी रसद पुरवली जात आहे.व्हायरल होत असणारा दाखला हा षडयंत्राचा भाग आहे, असा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
दरम्यान, यासंदर्भात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही त्या कंपनीचं नाव बघितलंय का? हा बालिशपणा चाललाय”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात”, अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.
शरद पवारांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं? सोशल मीडियावर कथित जातीचा दाखला व्हायरल
व्हायरल प्रमाणपत्राला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या गटाकडून त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या प्रती दाखवल्या जात आहेत. या प्रतींमध्ये शरद पवार यांच्या नावासमोर ‘मराठा’ असा उल्लेख असून त्यांनी कधीही कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं नाही, असं शरद पवार गटाकडून सांगितलं जात आहे.