राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
“महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.
त्यावर आता प्रतिक्रिया उमटत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आक्षप घेत न्यायालयाच्या निकालाची प्रत आपल्या ट्विटमध्ये जोडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
“छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली,” असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
“आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले,” असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली – राज्यपाल कोश्यारी
“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.