भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय करत आहे. मला याच्या वेदना होत आहेत. कारण, हा फक्त देवेंद्र फडणवीसांचा नाहीतर भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान आहे, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा देवेंद्र फडणवीसांवर अन्याय करत आहे. मला याच्या वेदना होत आहेत. हा फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपमान नाही. तर, गेल्या ६० वर्षात काँग्रेसच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, सतरंजा उचलणारे आणि लाठ्या खाणाऱ्यांच्या कष्टामुळे भाजपाचे १०५ आमदार निवडून आले. तरीही, त्यांच्या पदरात काही पडलं नाही.”
“देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस विचाराचा मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला आहे, याचं मी मनापासून स्वागत करते. कारण, भाजपा सतत ‘काँग्रेस मुक्त’ भारत व्हावा, असं म्हणायचा. काँग्रेसमुक्त भारत विचार सोडा. पण, भाजपाचे जास्त आमदार निवडून आले, तरी काँग्रेसच्या विचारांचा मुख्यमंत्री त्यांना पाहिजे,” असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.
“बहुमताच्या आधारे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाला, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लहान मुलांनाही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली, हे माहिती आहे. निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण, भीती एका गोष्टीची वाटते की, परीक्षेला बसायच्या आधीच समोरील गटाला निकाल कसा माहिती? चिन्ह याच तारखेला मिळणार, हेही कसं माहिती? एकतर पेपर फुटला आहे किंवा दिल्लीतील अदृश्य शक्तीने यांच्या कानात चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार असल्याचं सांगितलं आहे,” अशी शंका सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.
“दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात एकच अदृश्य शक्ती कटकारस्थान रचत आहे,” असं मोठं विधान सुप्रिया सुळेंनी केलं.