भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. दरम्यान, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली आहे. या कृत्यानंतर शाई फेकणाऱ्या व्यक्तीवर ३०७ कलमाअंतर्गत (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
संबंधित प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला वाटतं, गृहमंत्र्यांचा कायदा हा नियमाप्रमाणे चालत नाही, तो त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो. ते अभिमानाने सांगतात, आमचं ‘ईडी’ सरकार आहे. कुणीही त्यांच्या विरोधात बोललं तर त्याच्या पाठीमागे तपास यंत्रणांची चौकशी लावली जाते. देशातील राजकीय नेत्यांवरील एकूण गुन्ह्यांपैकी जवळपास ९५ टक्के गुन्हे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर दाखल कले आहेत. त्यांच्या पक्षातील एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला, तर त्याला वाॉशिंग मशीनमध्ये घातल्याप्रमाणे साफ करून ‘क्लीन चीट’ दिली जाते, हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे. याबाबतचा तपशीलही समोर आला आहे. मी कुठलेही वैयक्तिक आरोप करत नाही.”
हेही वाचा- “…हे अतिशय दुर्दैवी आहे”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याच्या कृत्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण त्या प्रकरणावर पडदा टाकायला पाहिजे. पण काल पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली, ती अयोग्य होती. आपण अनेक पद्धतीने निषेध करू शकतो. पण कुणावरही अशी शाई फेकणं आयोग्य आहे. अशी कृती कुणीही करू नये, ही माझी विनंती आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.