आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विठ्ठलाची शासकीय पूजा करतात. तर कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा केली जाते. गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा केली होती. परंतु, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. तसेच कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकीनिमित्त विठ्ठलाची पूजा करणार असा प्रश्न राज्यातल्या जनतेलाही पडला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंदिर समितीसमोर असलेल्या पेचावर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणी पूजा करावी, याबद्दल मला काही माहिती नाही. माझ्या मनात आणि माझ्या ओठांवर नेहमी ‘राम कृष्ण हरी’ हेच शब्द असतात. मी ‘राम कृष्ण हरी’चा जप करणारी आहे. आपण सगळे वारकरी आहोत, सगळे शेतकरी आहोत. आपलं फक्त ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा’ एवढंच असतं.
हे ही वाचा >> “राजकीय फटाके फुटायला अजून वेळ, जनसामान्यांना अपेक्षित…”, आमदार अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य
मंदिर समितीच्या बैठकीत काय ठरलं?
कार्तिकीनिमित्त शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा यासंदर्भात मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्रींची शासकीय पूजा केली जाणार आहे. या वर्षी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्याची चर्चा मंदिर समितीच्या बैठकीत झाली. त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार आहोत.”