राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी ( ५ जानेवारी ) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ईडी आणि सीबीआयनं टाकलेल्या धाडीतील ९५ टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे.”
“बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला”
शरद पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “बारामती हा माझा मतदारसंघ नसून कुटुंब आहे. १५ वर्षे झालं मी बारामती मतदारसंघात काम करत आहे. बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, माझं तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?” अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
“महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी संघर्षाची तयारी”
ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनीही ‘एक्स’ अकाउंटवर सूचक असं ट्वीट केलं आहे. “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,” असं रोहित पवारांनी म्हटलं.