गुजरातच्या सुरत येथील एका उद्योजकाने ‘बँक ऑफ बडोदा’ बँकेतून १०० कोटी रुपयांचं कर्ज घेऊन परदेशात पळून गेल्याचं प्रकरण समोर आलं. विजय शाह असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तो आपली पत्नी कविता शाहसह अमेरिकेला पळून गेला आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार आहे. विजय शाह आणि त्यांची पत्नी कविता शाह यांच्यासह सतीश आग्रवाल नावाच्या व्यक्तीने बँक ऑफ बडोदातून १०० कोटींचं कर्ज घेतलं होतं. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून चौकशीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेल्या एकाही व्यक्तीला हे सरकार परत आणून वसुली करु शकले नाही. आता गुजरातमधील विजय शाह आणि आणखी एका भामट्याने सुरत येथील बँकेचे शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पलायन केले. ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकारच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांसारख्या आर्थिक गुन्हेविषयक अतिसक्रीय संस्थांच्या नाकावर टिच्चून हे बँकबुडवे पळून गेले आणि या संस्थांना यांची काहीच खबर लागली नाही, हे निश्चितच पटण्यासारखे नाही.”

हेही वाचा- “अजित पवारांचा निर्णय योग्यच, त्यांनी संघर्ष…”, ‘त्या’ निर्णयावर शरद पवारांचं मोठं भाष्य

“केंद्र सरकारने या संस्था केवळ विरोधकांवर छापे टाकून त्यांना बदनाम करण्यासाठी पाळल्या आहेत का? कोट्यवधी रुपयांचे बोगस व्यवहार होत असताना याची शासनाच्या एकाही यंत्रणेला खबरही लागत नाही, हे पटण्यासारखे नाही. बँकांचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. शासनाने तातडीने या व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on gujarat 100 crore scam vijay shah bank of badoda rmm