Supriya Sule : महाराष्ट्रात महायुतीला निर्वावाद बहुमत मिळालं आहे. भाजपाला अभूतपूर्व १३२ जागा जिंकता आल्या, तर शिंदेसेनेने ५५ जागांवर विजय मिळवला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही ४० जागांवर आपला ठसा उमटवला. एकंदरीत राज्यात नवं सरकार स्थापन होण्यास संख्याबळाची अडचण नसतानाही निकालानंतर तीन दिवसांनीही सरकार स्थापन झालेलं नाही. १४ वी विधानसभा संपुष्टात येऊन १५ वी विधानसभा अस्तित्वात आलेली असली तरीही राज्यात मुख्यमंत्री पदाचा घोळ अद्याप कायम आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मुख्यमंत्री पदावरील रस्सीखेचमुळे राज्याला पुन्हा एकदा २०१९ सालची आठवण येऊ लागली आहे. दरम्यान, यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या.
“मला आश्चर्य वाटत नाही. एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर दुधाच्या भावात तीन रुपयांनी कपात केली. हे तीन रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते. ज्यांनी विश्वासाच्या नात्यावर मतदान केलं त्यांच्यावर त्यांनी पहिला घणाघात गरीब शेतकऱ्यांचा केला. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात मोठ्या समस्या असतानाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जात नाहीय. हे लॉजिकच्या बाहेरचं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कमिटमेंटचा विषय आताही
एकनाथ शिंदेंना कोणताही शब्द दिला नव्हता असं महायुतीचे नेते म्हणत आहेत, यावर सुप्रिया सुळेंना विचारलं असता, त्या म्हणाल्या, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला शब्द दिला, कोणी फिरवला. कारण २०१९ मध्ये उद्धवजी हेच सांगत होते. २०१९ मध्ये जसा कमिटमेंटचा विषय झाला तसाच २०२४ मध्ये झालाय. हे फार रंजक आहे.”
शिंदेंचा चेहरा घेऊन महायुती लढली
“२०१९ मध्ये हेच वारंवार सांगत होते. त्यांची युती तुटली ती यावरूनच तुटली. आता तीच परिस्थिती पुन्हा झालीय. शेवटी शिंदेंच्या चेहऱ्यांवरून झालं. तो शिंदेंचा करिष्मा होता हे सर्वांनी मान्यच करावं लागेल. एका सशक्त लोकशाहीत आम्हाला मान्यच करावं लागेल शिंदेंचा चेहरा घेऊन महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं. ते नेते, मुख्यमंत्री आणि त्यांनी केलेले कष्ट मान्य करावं लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.